मुंबई: मुंबईतील राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी फोडणे हा माझा उद्देश नाही तर शिवसेना वाढवणे हे आपले काम असल्याचे अहिर यावेळी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख जी जबाबदारी देतील ती आपण पार पडणार असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. अहिर यांनी हाती शिवबंधन बांधल्याने मुंबई राष्ट्रवादीला हा मोठा धक्का समजला जात आहे.
राजकारणात कधीतरी काही निर्णय घ्यावे लागतात, ते चूक की बरोबर सांगता येत नाही. राष्ट्रवादी सोडताना फार आनंदी नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. उद्धव ठाकरे, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची संधी मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे, असे सचिन अहिर म्हणाले आहेत.
कोण आहेत सचिन अहिर..?
सचिन अहिर हे मुंबई राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये ते गृहनिर्माण राज्यमंत्री होते. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सचिन अहिर यांच्यामागे तरुणांची मोठी फळी असल्याचं दरवर्षी दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळतं. त्यामुळे सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडली तर ते पक्षासाठी मोठं भगदाड असेल.